हरवलेल्या पाखरांची शाळा

 


🕊️🏩🕊️🏩🕊️🏩🕊️🏩🕊️🏩🕊️🏩

हरवलेल्या पाखरांची शाळा


माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा - दहावी 2003-04,लोहटार

        एकमेकांना भेटण्याची ओढ,बालपणाच्या साठवलेल्या आठवणींना पुन्हा व्यक्त करण्याचं माध्यम ठरलं होतं 'माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा' दहावी बॕच 2003-04.ठिकाण कोणतं असावं तर जगण्याचं सामर्थ्य आपल्यात जी भरते ती म्हणजे शाळा...!


      प्रत्येकाच्या जीवनात शाळेला काय स्थान असतं तर आईहून ते काही कमी नसतं.ही आपली सर्वांची प्रार्थनास्थळंच.यातील देव म्हणून लाभलेले शिक्षक जे प्राथमिक असो की माध्यमिक कोवळ्या बालमनाला,किशोर,कुमार वयाला नेहमीच ते आकार देतात.आमचं लोहटार गाव.प्राथमिक शाळेत आम्हांला लाभलेले वाणी गुरूजी आणि चिंचोले गुरूजी आमच्यासाठी खास आहेत.माध्यमिक शाळेतील श्री.एन.आर.पाटील सर यांच्यापासून लाभलेले सर्व सेवानिवृत्त शिक्षक आणि सध्या कार्यरत असलेले सर यांचे योगदान आमच्यासाठी खास होतं,आहे.म्हणूनच सर्व दहावी 2003-04 च्या बॕचने मुलं मुली एकत्र येत दि.23 एप्रिल 2023,रविवार रोजी स्नेह मेळावा घेण्याचं नियोजन केलं.  


       आपल्या शिक्षकांना भेटण्याची अन् आपलाही पुन्हा वर्ग भरावा म्हणून सर्व मित्रांनी आपल्यावर आलेली जबाबदारी पार पाडली.प्रत्यक्ष कार्यक्रमादिवशी निमंत्रित सारेच शिक्षक हजर राहिले.गावाच्या इतिहासातला हा पहिलाच कार्यक्रम अन् त्यास फक्त एका व्हाटस्अप मेसेजने संस्थेचे चेअरमन डॉ.जगदिश महाजन 'बाबा' पूर्णवेळ उपस्थित राहिले हे आम्हांला विशेष होते.


      नियोजनाप्रमाणे सर्व शिक्षकांना 'गार्ड आॕफ आॕनर' दिला जाऊन सन्मानाने व्यासपीठावर विराजमान केले गेले.दिपप्रज्वलन अध्यक्ष डॉ.जगदिश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.आपल्याला लाभलेल्या शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त करत निधन झालेले कै.सोनी सर,कै.वाघ सर,कै.शाम सर,कै.अनिल सर,वर्गमित्र निवृत्ती पाटील,महेबुब यांना सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.नंतर पुढे सर्व आजी माजी शिक्षकांना शाल,श्रीफळ,पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याविषयी असलेला आदर पाहून शिक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.


      सुत्रसंचलन मित्र नंदू परदेशी यांनी तर प्रास्तविक सचिन भोई यांनी केले.आपल्या मनोगतात मनोज जोशी,योगेश ब्राम्हणे,प्रियंका येवले,अविनाश अहिरे,किरण राजपूत,भरत पाटील यांनी आपल्या जीवनात माणूस म्हणून जगतांना शाळेची,येथील शिक्षकांची असलेली भूमिका तर मांडलीच पण शिक्षक विद्यार्थी यांचे अनोखे किस्से सादर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.आपल्या स्नेह मेळाव्यानिमित्त व्यक्त होतांना विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांविषयी असलेला आदरभाव,जडणघडणीत असलेला वाटा बोलून दाखवला.


      याप्रसंगी श्री.बी.एस.चौधरी सर,श्री.एम.सी.सोमपूरकर सर,श्री.एस.आर.परदेशी सर,श्री.पी.के.महाजन सर.श्री.व्हि.पी.वाणी सर,श्री.अशोक चिंचोले गुरूजी,श्री.ए.बी.महाजन सर,श्री.एन.आर.पाटील सर,श्री.आर.पी.पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जीवनात एक जबाबदार नागरिक होण्याचं आवाहन आपल्या विद्यार्थ्यांना केलं.आयुष्यात यशस्वी जरूर व्हा पण सत्याचा मार्ग,प्रामाणिकपणा,जिद्द,संघर्ष करा,न्यायी रहा असा दिव्य संदेश यावेळी सरांनी दिला.आपण जरी सेवानिवृत्त झालो तरी आपले विद्यार्थी आपला सन्मान घडवून आणतात हे खास होतं आज शिक्षकांसाठी.'हाच तर सर्वोत्तम पुरस्कार आहे आमचा' सहजच बोललेले शब्द काळजात घर करून गेलेत.यावेळी व्यसपीठावर मनोगत व्यक्त करणाऱ्या शिक्षकांसह श्री.एम.एस.महाजन सर,श्री.एम.आर.परदेशी सर,श्री.एस.एस.चौधरी सर,श्री.जे.आर.येवले सर,श्री.डि.एल.पाटील सर,श्री.ए.बी.म्हसदे सर,श्री.दिपक महाजन सर,श्री.के.एस.पाटील सर,श्री.दिपक बोरसे सर,श्री.सोपान महाजन सर,श्री.डि.बी.वाघ सर,श्री.पी.आर.येवले सर,सौ.एस.एन.वाणी मॕडम,सौ.यु.वी.गुजर यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी श्री.संजय मालपुरे,श्री.एस.बी.मोरे,श्री.प्रवीण पाटील,प्रसन्न पाटील उपस्थित होते.


    अध्यक्षिय भाषण करतांना डॉ.जगदिश महाजन यांनी गावातल्या इतिहासात हा प्रथमच सन्मानाचा कार्यक्रम होतोय आणि विद्यार्थ्यांनी अनमोल अशी भेट आपल्या शिक्षकांना दिली आहे असे म्हटले.कृतज्ञता व्यक्त करणं,सन्मान करणं हे तुम्ही जीवनाच्या उतारवयात आनंदाचा शिधा देत आहात.संस्थेतील सर्व आजी माजी शिक्षकांचा,शिक्षकेतर कर्मचारी यांचा झालेला सन्मान हा गौरवास्पद क्षण असल्याचा भाव व्यक्त करतांनाच असेच स्नेह मेळावे नेहमी व्हावेत असाही आशावाद डॉ.जगदिश महाजन म्हणजेच आमचे सर्वांचे आदरणीय बाबा यांनी यावेळी व्यक्त केला.


     कार्यक्रमाच्या शेवटाला मित्र गोकुळ सोनार याने आभार मानलेत.आपल्या शाळेप्रती असलेला स्नेह जपत विद्यार्थ्यांनी शाळेस भेटवस्तू भेट दिली.आपल्या गुरूवर्यांसोबत एक फोटो काढला.दुपार झाली असल्याने नियोजनाप्रमाणे जेवण झाले अन् व्हि.डी.वाणी सर यांनी पुढाकार घेत भरवला ना आमचा दहावीचा वर्ग...!पुन्हा विद्यार्थीरुपी पाखरांची शाळा भरली अन् दाटला सागर आठवणींचा..!


       वर्गाच्या आठवणी किती गोड असतात हे शिक्षक जाणून असतात.इथले बेंच,फळा,भिंती,मित्र सारं अनुभवता यावं म्हणून आम्हांला लहान बनवलं आणि शिकवलं सरांनी.पुढे घंटा वाजली की शिक्षक बदल व्हायचा.श्री.व्हि.डी.वाणी सरांसह,श्री.व्हि.पी.वाणी सर,श्री.पी.के.महाजन सर,श्री.एस.आर.परदेशी सर,श्री.डि.एल.पाटील सर,श्री.चिंचोले गुरूजी यांनी पाच ते दहा मिनिटांची तासिका घेत मुलांच्या हौसेला मूर्त रूप दिलं हे विशेष.वंदे मातरम् वर्ग सुटला..! तुम्ही आम्हांला आनंद दिलात मग आम्ही का नको तुम्हांला आनंद द्यायचा.सेवानिवृत्तीनंतरही तोच संवादाचा आपलेपणा आम्हांला जाणवला.


       शेवटच्या सत्रात आम्ही सर्वांनी जेवण केले.मस्त गप्पा झाल्या.आपण कुठे काय करायचो,मनमोकळं हसणं,गप्पा करणं सारं सहजच होत होतं.आपल्या शिक्षकांशी गप्पा मारतांना मजा आली.खूप बोलायचं होतं पण राहूनच गेलं असं झालं.फोटोसेशन झालं सारं झालं.कार्यक्रम झाल्यावर आवारात झालेली घाण ही मुलामुलींनी स्वच्छ केली अन् सकाळी जशी शाळा होती तशीच ती आता दिसायला लागली होती.सकाळी आठ वाजलेपासून सुरू झालेली लगबग साडेतीन वाजेपर्यंत सुरूच होती.आता परतीचा प्रवास सुरू झाला.


      'आठवणींची साठवण' सर्वांनी हृदयात ठेवली.आपल्या शिक्षकांना झालेला आनंद,त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं स्मित यासाठीच सारा खटाटोप सुरू होता.स्नेह मेळावा खास होता आमच्यासाठी.हा स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी राबणाऱ्या  प्रत्येक मित्र मैत्रीण यांचा यात सिंहाचा वाटा होता.सर्वांनीच आपल्यातला बेस्ट दिला म्हणूनच एका आगळ्या वेगळ्या स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला फक्त एकतेमुळे,संघटनमुळे..!


     चांगली शाळा ही चांगले विद्यार्थी घडवत असते.संस्काराचे दिप इथेच लावले जातात.हे आपलं प्रत्येकाचंच प्रार्थनास्थळ असतं आणि यात असलेले शिक्षकरुपी देव हेच तर आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात.आज आम्ही जमिनीवर आहोत ते फक्त आमच्या शाळेच्या संस्कारामुळेच अन् आम्हांला लाभलेल्या शिक्षकांमुळेच.यात हवा असतो फक्त एकमेकांप्रती विश्वास अन् त्याच विश्वासावर चांगला जबाबदार नागरिक घडतो हे ही तितकेच खरंय.आम्हां हरवलेल्या पाखरांना एकत्र आणण्यासाठी सहजच शाळारुपी ज्ञानमंदिर उपलब्ध करून देणाऱ्या संस्थाचालकांसह,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आम्ही कायम ऋणी राहू..!


    स्नेह मेळावा फक्त निमित्त झालं पण लोहटार अन् अंतुर्लीच्या मित्रांचं पुन्हा नातं घट्ट झालं यामुळे.तोच त्यावेळचा आपलेपणा,आपुलकी,जिव्हाळा,निर्मळ क्षण पुन्हा जगता आले हे खास होतं आमच्यासाठी.एकमेकांचा निरोप घेतांना नको वाटत होतं,पण भूतकाळ पाठीशी असतांना वर्तमानाचं भान राखत पुन्हा विद्यार्थी आपल्या घरट्याकडे वळालेत नव्या आत्मविश्वासाने,नवे स्वप्नं घेऊन जिद्दीने जीवनात यशस्वी होण्यासाठी.म्हणूनच तर म्हटलं जातं...


अशी पाखरं येती,आणिक स्मृती ठेवूनी जाती..!

दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती..!



- भरत विठ्ठल पाटील

दहावी बॕच 2003-04

कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालय,लोहटार ता.पाचोरा जि.जळगाव 

9665911657

Comments

Popular posts from this blog

स्नेह मेळावा

आठवणींची शाळा

कै.सुं.सि.मालपुरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा