आठवणींची शाळा


 आठवणींची शाळा

      जिचे नाव जरी आपल्या समोर आले तरी उभा राहतो तो आठवणींचा डोंगर ती म्हणजे आपली शाळा.आपण सर्वजण वाट पाहत होतो की आपण एकत्र यावं हे सर्व कसे स्वप्नवत वाटत होतं.

     ''गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः" आपल्या शास्त्रामध्ये ज्यावेळी बोलायला लागतं,चालायला लागतं, शाळेत जायला लागतं तेव्हा पहिलाच हा श्लोक ऐकत असतो. हा श्लोक ऐकतो,गुरूंकडून ज्ञान घेतो. मोठे होतो.उंच आकाशात भरारी घेतो, पण त्या गुरूंना आपण विसरत नाही परंतु त्या गुरूंना आपण कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही.हे सांगावं असे प्रत्येक विद्यार्थ्याला कधी तरी नक्कीच वाटत असतं,की मी इतका उंच आकाशात उडतो आहे तो फक्त आणि फक्त या गुरूंमुळेच.गुरु आपल्याला या भारतीय शिक्षणपध्दती मध्ये तीन प्रकारचे भेटतात. एक म्हणजे बालपणीचे दुसरे म्हणजे पहिली ते दहावीचे आणि तिसऱ्या आपले ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रज्युएशनचे..पण मला असे वाटते सर्वात जास्त जे पायाभक्कम करतात ते गुरु नेहमीच स्मरणात राहतात ते म्हणजे पहिली ते दहावीचे गुरु. केव्हाही मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले जाते पण मला असं वाटते नेहमी नमस्कार करावा तर लहानपणीच्या गुरूंचाच. 

         मुलांना शिकवताना कामांमध्ये नेहमी गुरूंची आठवण येत असते,जसे मला चिंचोली गुरुजींची आठवण माझ्या मुलाचे पाढे पाठ घेत असताना येते.. मी चौथीत होते तेव्हा रोज गुरुजी आम्हाला पाढे पाठ करायला सांगत होते पण वीस च्या पुढे आमचे पाढे पाठ काही होत नव्हते.तेव्हा गुरुजींनी सांगितलं उद्या ज्यांनी 25 पर्यंत पाढे पाठ केले त्यांना मी एक रुपयाचे बक्षीस देईल आणि त्या दिवशी मी ते बक्षीस मिळवले.

       सर्व गृहिणींना आपल्याला स्वयंपाक घरात तर जावेच लागते स्वयंपाक बनवावाच लागतो.जेव्हा या स्वयंपाक घरात भेंडीची भाजी बनवली जाते तेव्हा एन.आर.पाटील सरांची फार आठवण येते.सर वर्गात आल्या आल्या रीडिंग करायला उठवायचे आणि विचारायचे पाव किलो भेंडीचे भाजीला तू किती पाणी टाकशील? अचानक उठल्यामुळे गोंधळलेलं मन होते,लक्ष सर्व पाव किलो आणि किती,भेंडीची भाजी सांगितली हे कुठे समजायचं तेव्हा.. अर्थात आजही कोणी क्वेश्चन विचारला किंवा प्रश्नपत्रिकेत प्रश्न आधि समजून घ्यायचा मग उत्तर द्यायचे हे खूप मोठी गोष्ट त्यातून शिकायला मिळाली.

        बी.एस.चौधरी  सरांची वकृत्व शैली खूप आवडते. वते बोलायला लागले की विदयार्थी पिन ड्रॉप सायलेंट. खूप सुंदर हिंदी बोलतात.

अजुन एक के.डी.परदेशी सरांची आठवण आठवी नववीला असताना, सरांनी 40 चे स्पेलिंग सर्वांना विचारले सर्वांनी fourty- fourty फक्त एका विद्यार्थ्यांनी उत्तर सांगितले forty चे स्पेलिंग आठवत नव्हते पण सर्वांच्या एकूण सांगितले आणि यु विसरला, आता जिथे 40 दिसला तिथे मला के डी परदेशी सरांची आठवण येते.

  अशा खुप आठवणी आहेत.पण वेळेअभावी बोलू शकत नाही.. जुनी शाळा जुनी शाळा हे म्हणजे काय असते ते म्हणजे बालपणीच्या काळात किशोर वयात भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये अलौकिक शक्ती देणार स्थान ती म्हणजे आपली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा लोहटार  हे बघा नेहमी आपण म्हणत असतो पंतप्रधान निवृत्ती झाल्यावर माझी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी खासदार, माजी आमदार, परंतु आपण कधी आपण आपल्या शिक्षकांना भेटतो तेव्हा आपण असे म्हणत नाही की माजी शिक्षक,तर त्यांना आपण म्हणतो माझे शिक्षक चालले, हे माझे शिक्षक आहेत. कारण शिक्षकाचे स्थान नेहमी विद्यार्थ्यांच्या हृदयात असते.

     आज स्नेह संमेलनाच्या निमित्तानं सर्व शिक्षक आणि आपण सारे वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आलो.आजचा दिवस सर्वांसाठी आठवणीत जपून ठेवावा असा आहे.तब्बल वीस वर्षानंतर आज दहावीचा वर्ग भरला आणि शिक्षकांनी तेवढ्याच उत्साहाने आपल्याला दहावीचा वर्गाचा अनुभव दिला.आज सर्व शिक्षकांच्या सहवासात लहानपण जगता आले.आठवणींची शाळा प्रत्यक्षात अनुभवता आली.


- प्रियंका येवले

दहावी,2003-04

Comments

Popular posts from this blog

स्नेह मेळावा

कै.सुं.सि.मालपुरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा